Mission Career
Your Success Starts with Us

शेतकऱ्यांची लेक स्वप्नांच्या मागे बेफाम धावली; जगाची सुवर्णकन्या बनली, आता डीएसपी पदी !

0

समाजात अजूनही गावातील मुलगी म्हटलं की वाईट, बुरसटलेल्या नजरेतून बघितले जाते.पण हिमा हिने खरा आदर्श निर्माण केला आहे.तिला कधीच नव्हती शहराची, झगमगीत जीवनाची ओढ पण तिला नेहमीच होती ती खेळातील जिद्द आणि हिंमतीची ओढ…ती धडपडली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि जिंकली लाखोंची मने.हाच तिचा प्रेरणादायी प्रवास लाखोंसाठी आदर्श ठरत आहे.

गावाने खरे जीवन शिकवले….

आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात हिमा दास या धाडसी लेकीचा जन्म झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
आजही हिमाच्या गावात तीन-चार तासच वीज येते. खेळण्यासाठी ना कुठलं ग्राऊंड आहे न कोणत्या सोईसुविधा होत्या.पण हिंमत मात्र कायमस्वरूपी होती.परिस्थितीचा दिखावा न करता.ती परीस्थिती सोबत लढत राहिली‌.

धावपटू बनायचे नव्हते…

खेळ आणि हिमा हे जणू समीकरणच बनले होते.लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली.
2016 पर्यंत ज्या मैदानात हिमाने धावण्याची प्रॅक्टिस केली, तिथे आजही सकाळ-संध्याकाळ गुरं चरतात. वर्षातून तीन महिने पावसाचं पाणी भरलेलं असतं पण या सगळ्या अडचणींना हिमाने आपली ताकद बनवलं.

बालपणीचं स्वप्न पूर्ण, थेट आसाम पोलीस विभागात अधिकारी!

प्रसिद्ध धावपटू हिमा दासला शुक्रवारी (26 फेब्रुवारी) आसाम पोलीस विभागात उप अधीक्षक (डीएसपी) म्हणून नियुक्त करण्यात आलंय. हिमाने (Hima Das) आपल्या लहानपणी पाहिलेलं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. हिमाला आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

खेळातून खऱ्या सुखाची वाट…

हिमानं २०१८मध्ये फिनलँड येथे झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. तिनं ४०० मीटर शर्यतीत बाजी मारली होती.
२०१८ -जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा; ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले.
२ जुलै २०१९ -पोझनान ॲथलेटिक्स ग्रांप्री, पोलंड – २०० मी. (२३.९५ सेकंद)
७ जुलै२०१९ -कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, पोलंड – २०० मी. (२३.९७ से.)
१३ जुलै २०१९-क्लादनो स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – २०० मी. (२३.४३ से.)
१७ जुलै २०१९ : टाबोर स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – २०० मी. (२३.२५ से.)
२० जुलै २०१९: नोव मेस्टो ग्रांप्री, चेक प्रजासत्ताक – ४०० मी. (५२.०९ सेकंद)
ती एवढ्यावरच थांबली नाहीतर आसाममध्ये पुर प्रसंगी,कोरोनाच्या काळात कित्येकांचा आधार देखील बनली.खेळ असो की समाजकार्य सगळीकडे प्रामाणिकपणाने हिंमतीने भरारी घेत जगताना दिसून येत आहे.

ही प्रेरणा कित्येकांना नव्याने उभे राहण्यासाठी बळ देते.

Leave A Reply

Your email address will not be published.